30.9 C
New York

Health News : पावसाळ्यात लहान मुलांवर आजारांचे सावट पुण्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतोय?

Published:

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच आरोग्याच्या दृष्टीने धोकादायकही ठरतो, विशेषतः लहान मुलांसाठी. सध्या पुणे शहरात 2 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, जुलाब आणि अतिसार यासारख्या संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलते हवामान, हवेतील वाढलेली आर्द्रता, साचलेले पाणी, अस्वच्छता आणि दूषित अन्न व पाणी.

लहानग्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने अधिक धोका

लुल्लानगर, पुणे येथील मदरहुड हॉस्पिटलमधील सल्लागार बालरोगतज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी सांगितले की, लहान मुले अधिक संवेदनशील असतात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती मोठ्यांच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. सध्या दररोज त्यांच्या ओपीडीमध्ये सर्दी-खोकल्याचे सुमारे 15, अतिसाराचे 4, तर विषाणूजन्य तापाचे सुमारे 5 रुग्ण येत आहेत.

जर वेळीच उपचार झाले नाहीत, तर याच आजारांतून डिहायड्रेशन, ब्राँकायटिस, न्यूमोनिया यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात, ज्या थेट श्वसन प्रणालीवर परिणाम करतात.

पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया आणि जलजन्य आजारांचा धोका

या हंगामात केवळ सामान्य सर्दी ताप नव्हे, तर गंभीर आजारसुद्धा वाढू शकतात. डेंग्यू, चिकनगुनिया हे डासांमुळे पसरणारे आजार तर गॅस्ट्रोएन्टेरिटिस, लेप्टोस्पायरोसिस हे दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे आजार आहेत. त्वचेचे आजार, पुरळ, बुरशीजन्य संक्रमण हेही मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

पालकांनी घ्यावयाची काळजी

  • उकळून थंड केलेले पाणीच पिण्यास द्या
  • बाहेरचे अन्न, विशेषतः फास्टफूड, टाळा
  • हात वारंवार धुण्याची सवय लावा
  • सॅनिटायझर आणि जंतुनाशकांचा वापर करा
  • शरीर झाकणारे स्वच्छ आणि सैलसर कपडे घालवा
  • डास प्रतिबंधक वापरा – लोशन, माशी जाळी, इलेक्ट्रिक रेपलेंट्स
  • घरात आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका
  • पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ करा

शाळा आणि पालकांचा समन्वय गरजेचा

मुलं बहुतेक वेळा शाळेतच एकमेकांच्या संपर्कात असतात, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. शाळांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक दक्षता ठेवणे, तसेच आजारी मुलांना घरीच विश्रांती देणे, इतर मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

जर मुलामध्ये ताप, सतत खोकला, पाणीदार जुलाब, अशक्तपणा, चिडचिड वाढणे, खाण्याची इच्छा कमी होणे असे लक्षणे दिसल्यास, डॉक्टरांचा सल्ला तात्काळ घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात फक्त छत्री आणि रेनकोट पुरेसं संरक्षण देत नाही. लहानग्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतर्कता, स्वच्छता आणि वेळेवर उपचार हेच त्यांना आजारांपासून दूर ठेवू शकतात. आपल्या लहान मुलांचे आरोग्य ही आपली जबाबदारी आहे – काळजी घ्या, सजग रहा!
.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img