कोणताही ऋतू असो, त्वचेची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. पण त्यातही कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना विशेष लक्ष द्यावं लागतं. अनेक घरगुती उपाय आजमावले जातात, पण त्यामध्ये एक सर्वसामान्य, प्रभावी आणि सोपा उपाय म्हणजे ग्लिसरीन. त्वचेसाठी वरदान ठरलेलं हे घटक फक्त चेहऱ्यापुरतं मर्यादित नाही, तर केस, ओठ, हात-पाय अशा अनेक भागांसाठीही उपयोगी ठरतं.
ग्लिसरीन म्हणजे काय?
ग्लिसरीन, ज्याला ग्लिसरॉल देखील म्हणतात, हे नैसर्गिकरित्या वनस्पतीजन्य तेलांपासून मिळवले जाणारे एक घटक आहे. यामध्ये कोणताही घातक रसायनांचा वापर नसतो. याचा शोध एका ऑलिव्ह ऑईलच्या प्रयोगातून लागला होता. तेव्हापासून साबण बनवणं असो किंवा त्वचा सौंदर्य प्रसाधनं — ग्लिसरीनचा वापर वाढतच गेला.
नैसर्गिक मॉइश्चरायझर:
कोरड्या, फाटलेल्या त्वचेला नवसंजीवनी देण्यासाठी ग्लिसरीन अत्यंत प्रभावी ठरतं. एक घरगुती उपाय म्हणून गुलाबपाणी आणि ग्लिसरीन समान प्रमाणात मिक्स करून हवाबंद बाटलीत साठवून ठेवा. रात्री चेहरा धुतल्यावर हे मिश्रण कापसाने लावल्यास त्वचा मऊ व तजेलदार होते.
त्वचेवरील डाग हटवतो:
ग्लिसरीनमध्ये थोडा लिंबाचा रस आणि कोरफड जेल मिसळून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्यावर १५-२० मिनिटं लावल्याने डाग हलके होतात. नियमित वापर केल्याने त्वचा उजळते आणि नितळ दिसते.
ओठांचं टॅनिंग कमी करतं:
काळसर झालेल्या ओठांसाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गुलाबपाणी + लिंबाचा रस + ग्लिसरीन. हे मिश्रण ओठांवर रोज रात्री लावल्यास टॅनिंग कमी होतं आणि ओठ गुलाबी व मऊ होतात.
मुरुमांवर प्रभावी उपाय:
ग्लिसरीनमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे मुरुमांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. खास करून सेंसिटिव्ह स्किन असलेल्या लोकांसाठी हे एक सुरक्षित पर्याय आहे.
संवेदनशील त्वचेसाठी सुरक्षित:
ग्लिसरीनमध्ये कोणतेही कडवे किंवा अॅसिडिक घटक नसल्यामुळे हे संवेदनशील त्वचेसाठी आदर्श आहे. यामुळे कोणताही लालसरपणा, खाज किंवा चट्टे होत नाहीत.
ग्लिसरीन वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ आणि कोरडा असावा. डोळ्यांभोवती किंवा झीजलेल्या त्वचेवर थेट न वापरणं चांगलं. लिंबाचा रस मिसळताना प्रमाण योग्य ठेवा, जास्त अॅसिडिटीमुळे जळजळ होऊ शकते. कोणताही नवीन उपाय सुरू करताना एक पॅच टेस्ट करून पहा.
ग्लिसरीन हा तुमच्या सौंदर्याच्या रुटीनमधील एक अतिशय महत्त्वाचा भाग बनू शकतो. बाजारात महागड्या स्किनकेअर उत्पादनांच्या ऐवजी हे नैसर्गिक, किफायतशीर आणि सुरक्षित पर्याय तुमच्या सौंदर्याला नैसर्गिक तेज देऊ शकतात. तुमची त्वचा कोरडी, डागाळलेली, किंवा पिग्मेंटेशनग्रस्त असेल तरीही ग्लिसरीनचा नियमित आणि योग्य वापर केल्यास ती मऊ, तजेलदार आणि निरोगी होईल हे नक्की!