प्रत्येक ऋतूत आईस्क्रीम का खास आहे? उन्हाळ्यात, ते आपल्याला थंडावा देतं, तर हिवाळ्यात ते आपल्या मनाला उबदार आठवणींनी भरतं. पावसाळ्यात, खिडकीतून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांसोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच! आईस्क्रीमची जादू फक्त त्याच्या चवीतच नाही, तर त्या मागच्या कहाण्यांमध्येही जादू आहे. त्यामुळे आज तुम्हाला एका अशा व्यक्तीची कहाणी सांगणार आहे , ज्याने आपल्या कष्टाने आणि स्वप्नांनी भारतातील आइस्क्रीमच्या जगात क्रांती घडवली. रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचा प्रवास एका फळ विक्रेत्याच्या मुलापासून ते भारताचा आवडता “आइस्क्रीम मॅन” बनण्याचा प्रवास! त्यांनी स्थापन केलेल्या नॅचरल्स आइस्क्रीमने आज प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. चला, जाणून घेऊया त्यांच्या यशाची गोष्ट, जी प्रेरणादायी आहे आणि प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची आणि मेहनतीने ते पूर्ण करण्याची प्रेरणा देते.
रघुनंदन कामथ यांचा जन्म १९५४ (“चोपन्न”) साली कर्नाटकातील मुल्की या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या कुटुंबात सात भावंडं होती, आणि ते सर्वात धाकटे. त्यांचे वडील फळ विक्रेते होते, आणि त्यांना आपल्या पत्नी आणि सात मुलांचं पालनपोषण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची. रघुनंदन लहानपणापासूनच आपल्या वडिलांना फळं निवडण्यात, त्यांची गुणवत्ता तपासण्यात आणि बाजारात विकण्यात मदत करायचे. या काळात त्यांनी फळांचे गुण, त्यांचा रंग, चव आणि टिकवणुकीचे तंत्र शिकले. हेच ज्ञान पुढे त्यांच्या यशाचं पायाभूत ठरलं.
वयाच्या १४व्या वर्षी, रघुनंदन यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. मुंबईत त्यांनी शाळेत प्रवेश घेतला, पण दुर्दैवाने ते बोर्डाच्या परीक्षेत दोनदा नापास झाले. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं आणि आपल्या मोठ्या भावाच्या “गोकुळ रिफ्रेशमेंट्स” नावाच्या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या हॉटेलात कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी घरगुती आइस्क्रीम विकायला सुरुवात केली. पण रघुनंदन यांना साध्या व्हॅनिला आणि चॉकलेट फ्लेवर्सपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यांना फळांचा नैसर्गिक रस वापरून आइस्क्रीम बनवायची कल्पना सुचली. पण त्यांच्या भावाने ही कल्पना नाकारली.
पण रघुनंदन थांबले नाहीत! त्यांच्या भावाच्या व्यवसायात फाटाफूट झाली, आणि त्यांना ३ लाख ५० हजार रुपये मिळाले. १९८४ (चौऱ्याऐंशी) साली त्यांनी या पैशातून मुंबईच्या जुहू कोळीवाडा परिसरात २०० चौरस फुटांच्या छोट्याशा जागेत, फक्त सहा कर्मचाऱ्यांसह आणि १२ फ्लेवर्ससह नॅचरल्स आइस्क्रीमची सुरुवात केली. त्यांनी आइस्क्रीमबरोबर पावभाजीही विकायला सुरू केली ही एक चतुर युक्ती होती! पावभाजीच्या तिखट चवीनंतर ग्राहकांना थंड आणि गोड आइस्क्रीम खाण्याचा मोह व्हायचा. पहिल्याच आठवड्यात त्यांनी १००० कप आइस्क्रीम विकले, आणि पहिल्या वर्षात १.५ लाख रुपयांची कमाई केली.
रघुनंदन यांनी त्यांच्या आईच्या स्वयंपाकातून शिकलेल्या युक्त्या आणि वडिलांकडून मिळालेल्या फळांच्या ज्ञानाचा उपयोग करून अनोख्या फ्लेवर्सची निर्मिती केली. सिताफळ, चिकू, जामुन, आंबा, आणि टेंडर नारळासारखे फ्लेवर्स त्यांनी बाजारात आणले, जे भारतीयांच्या चवीला परिपूर्ण जुळले. त्यांनी कृत्रिम रंग, फ्लेवर्स किंवा प्रिझर्व्हेटिव्हजचा वापर टाळला, आणि ताज्या फळांचा रस, दूध आणि साखर यांचा वापर केला. यामुळे नॅचरल्स आइस्क्रीमला एक वेगळीच ओळख मिळाली.
नॅचरल्सच्या यशाची लाट इतकी वाढली की, जुहूच्या गल्ल्यांमध्ये ट्रॅफिक जाम व्हायचे! १९९४ (चौऱ्याण्णव) साली रघुनंदन यांनी मुंबईत आणखी पाच दुकानं उघडली. त्यांनी थर्माकोल बॉक्सेसचा वापर करून आइस्क्रीमची पॅकेजिंग सुधारली, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय देशभर पसरला. आज नॅचरल्सचे १६५ (पासष्ठ) हून अधिक आउटलेट्स १५ शहरांमध्ये आहेत, आणि २०२० साली त्यांचा व्यवसाय ४०० कोटींहून अधिक मूल्याचा झाला होता.
रघुनंदन यांनी गुणवत्तेवर कधीही तडजोड केली नाही. त्यांचं दूध फक्त नाशिकच्या एका डेअरीतून येतं, आणि फळं विश्वासू पुरवठादारांकडून घेतली जातात. त्यांच्या कांदिवलीतील २५,००० चौरस फुटांच्या कारखान्यात सर्व आइस्क्रीम तयार होतं. त्यांनी पारंपरिक जाहिरातींवर खर्च न करता, ग्राहकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष केंद्रित केलं. उदाहरणार्थ, एका ग्राहकाच्या सूचनेनुसार त्यांनी “वाइल्ड मॅंगो” नावाचा फ्लेवर आणला.
रघुनंदन यांचं यश फक्त पैशात मोजता येत नाही. त्यांनी दाखवून दिलं की शिक्षणाची डिग्री नसली तरी मेहनत, चिकाटी आणि साधेपणा यांच्या जोरावर स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. त्यांच्या आइस्क्रीमला अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांसारख्या सेलिब्रिटींनीही पसंती दिली. २०१३ साली नॅचरल्सला भारतातील टॉप १० ब्रँड्समध्ये ग्राहक समाधानासाठी स्थान मिळालं.
दुर्दैवाने, 17 मे २०२४ रोजी, वयाच्या ७0 व्या वर्षी रघुनंदन कामथ यांचं निधन झालं. पण त्यांनी उभारलेला नॅचरल्स आइस्क्रीमचा वारसा आजही आपल्या चवीने आणि प्रेरणेने जिवंत आहे. त्यांची कहाणी सांगते की, स्वप्नं मोठी असावीत, मेहनत प्रामाणिक असावी, आणि आपल्या मुळांना कधीही विसरू नये.