गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा (Ahmedabad Plane Accident) अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अपघातस्थळावरून धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एकूण 242 लोक (Air India Plane Crash) होते, ज्यात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते.
आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला?
अहमदाबाद पोलिस कंट्रोल रूमने देखील याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानामध्ये 242 प्रवासी होते. टेकऑफनंतर 15 मिनिटांत लगेच विमान दुर्घटना झाली. ही घटना मेघानीनगर परिसराजवळ घडली आहे. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची आकडा अजून समोर आलेला नाही. परंतु शेकडो प्रवासी अपघातग्रस्त आहेत.
अपघात नेमका कसा झाला?
फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातंय. विमान अपघातामुळे परिसरातील इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण सांगितलेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूरमधून प्रचंड धूर दिसत आहे. बीएसएफ आणि एनडीआरएफ पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. अपघातग्रस्त विमान बोईंगचे 787 ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे, जे 11 वर्षे जुने होते.