आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः आहाराच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. घाईगडबडीत आणि वेळेअभावी घरी आरोग्यदायी जेवण बनवण्याऐवजी, बहुतांश लोक बाहेरील फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ याकडे वळले आहेत. हे पदार्थ चविष्ट असले तरी त्याचे शरीरावर होणारे परिणाम गंभीर असतात. विशेषतः यकृतावर याचा दुष्परिणाम होतो. यामुळे “फॅटी लिव्हर” नावाचा विकार अनेकांमध्ये आढळतो.
फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये गरजेपेक्षा अधिक चरबी जमा होणे. सुरुवातीच्या टप्प्यावर हा विकार थांबवता येतो, पण यासाठी शरीर देणारे लक्षण वेळेवर ओळखणं गरजेचं आहे. अनेक वेळा हे संकेत आपल्या नखांमधूनही मिळतात, पण दुर्लक्षामुळे स्थिती गंभीर होऊ शकते. चला, जाणून घेऊया नखांमधून दिसणारी लिव्हर समस्येची लक्षणं:
- नखांचा रंग बदलणे
यकृत योग्यरित्या कार्य करत नसल्यास नखांचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलून पिवळसर किंवा फिकट दिसू लागतो. हा रंग बदल दीर्घकाळ राहिल्यास, ही लिव्हरच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह असण्याची शक्यता आहे.
- नखांवर पिवळ्या किंवा लाल रेषा
जर नखांवर अनियमित लालसर किंवा पिवळसर रेषा दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता यकृताची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. हे रक्ताभिसरणातील दोष किंवा यकृताच्या सूजेमुळे होऊ शकते.
- लहान पांढरे डाग
अनेकदा प्रथिनांची कमतरता, पचनसंस्थेतील दोष किंवा लिव्हरची कमजोरी यामुळे नखांवर पांढरे डाग दिसतात. याकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्याऐवजी, ते लिव्हरची आरोग्य स्थिती दर्शवणारे संकेत मानावेत.
- वारंवार नखे तुटणे
कमकुवत लिव्हरमुळे शरीरातील पोषणशक्ती कमी होते. त्यामुळे नखे पातळ, कोरडी आणि सहज तुटणारी होतात. यासोबतच नखांचा नैसर्गिक आकारही बदलू लागतो.
- नखांचा वळलेला आकार
नखांचा पुढचा भाग वाकलेला किंवा उंचावलेला वाटू लागल्यास यकृताचा आजार दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचा इशारा असतो. याला “क्लबिंग” असेही म्हणतात. हे लिव्हरसोबतच हृदय व श्वसनविकारांचे लक्षणही असू शकते.
तुमच्या नखांमध्ये सतत काही बदल जाणवत असतील – जसे की वरील लक्षणं, तर हे लिव्हर संबंधित समस्या दर्शवू शकतात. यावर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेतल्यास उपचार शक्य होतात आणि गंभीर आजार टाळता येतो. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे तुमचं लिव्हर मजबूत राहू शकतं. बाहेरचे खाद्यपदार्थ शक्यतो टाळा आणि नैसर्गिक, घरचं अन्न खाण्याकडे कल वाढवा.