आपल्याला एखादा खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर पोटात गडबड होणे, त्वचेवर लालसरपणा, चेहऱ्यावर मुरुम, उलटी किंवा पित्त उठणे यासारखी लक्षणे दिसतात का? जर हो, तर हे केवळ सामान्य अपचन नाही, तर फूड ॲलर्जीचा इशारा असू शकतो. ही समस्या हलकीशी वाटत असली, तरी अनेकदा शरीरामध्ये आतून घडणाऱ्या प्रतिक्रिया दुर्लक्षित केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे आणि त्यातच बाजारात सहज मिळणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये असलेल्या कृत्रिम रसायनांचा वापर वाढल्यामुळे अॅलर्जीक प्रतिक्रिया अधिक सामान्य झाली आहे. धूळ, धूर यासोबतच काही विशिष्ट अन्नपदार्थदेखील शरीराला सूट होत नाहीत आणि यामुळे ‘सायलेंट फूड ॲलर्जी’ उद्भवते.
सायलेंट फूड ॲलर्जी म्हणजे काय?
ही अशी अॅलर्जी आहे जी लगेच लक्षणं दाखवत नाही. अनेकदा वर्षानुवर्षे लोकांना हे समजतच नाही की त्यांना काही अन्नपदार्थामुळे अॅलर्जी होत आहे. डॉ. नीता नायक यांच्यानुसार ही अॅलर्जी कोणत्याही वयात होऊ शकते. अगदी बाळाच्या जन्मापासूनही!
काही खाल्ल्यानंतर जर पोटात गॅस, अपचन, त्वचेवर रॅशेस, चेहऱ्यावर मुरुम, डोकेदुखी किंवा थकवा जाणवत असेल तर हे लक्षण फूड ॲलर्जीशी संबंधित असू शकतात. याला हलकं समजून दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
लक्षणे ओळखा:
त्वचेवर खाज सुटणे, लालसरपणा, रॅशेस चेहरा, ओठ, जीभ, घसा सूजणे पोटदुखी, उलटी, जुलाब चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास.
निदान कसे करावे?
- स्किन प्रिक टेस्ट: संशयित अन्नपदार्थ त्वचेवर लावून हलकंसं टोचलं जातं. लालसरपणा किंवा सूज आल्यास ती अॅलर्जीची लक्षणं असतात.
- रक्त तपासणी: इम्युनोग्लोब्युलिन ई (IgE) अँटीबॉडीचं प्रमाण तपासलं जातं, जे शरीरातील अॅलर्जीक प्रतिक्रिया दर्शवतं.
- फूड एलिमिनेशन डायट: एकावेळी एक पदार्थ आहारातून वगळून त्याची प्रतिक्रिया पाहणे.
उपचार काय आहेत?
अमेरिकन कॉलेज ऑफ ॲलर्जी, अस्थमा आणि इम्युनोलॉजी (ACAAI) यांच्या मते, अॅलर्जीच्या योग्य उपचारासाठी ऍलर्जिस्ट आणि आहारतज्ञ यांचा एकत्रित सल्ला घ्यावा.
डॉक्टर्स अचूक अॅलर्जी ओळखून त्यानुसार औषधोपचार करतात. आहारतज्ञ तुमच्यासाठी सुरक्षित आणि संतुलित अन्नपदार्थांचा आहारचार्ट तयार करतात. काही गंभीर अॅलर्जीत एपिनेफ्रीन इंजेक्शन (EpiPen) जवळ बाळगणं आवश्यक ठरू शकतं. नेहमी अन्नपदार्थांची लेबले वाचा. नवीन अन्नप्रकार प्रथम थोड्या प्रमाणात चाखा. सार्वजनिक ठिकाणी खाताना अॅलर्जीक अन्न टाळा. लहान मुलांमध्ये अॅलर्जी असलेली खाद्यपदार्थ टाळताना शाळा किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीला माहिती द्या.