पर्यटनाची आवड असणाऱ्या भारतीयांसाठी एक थरारक बातमी आहे! आता तुम्ही व्हिसाशिवाय तब्बल 59 देशांमध्ये मुक्तपणे भटकंती करू शकता. या यादीत नुकतेच फिलीपाईन्स (Philippines) या आकर्षक देशाचे नाव सामील झाले आहे. फिलीपाईन्सने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेशाचे दरवाजे खुले केले आहेत, ज्यामुळे हा देश भारतीयांचा आवडता पर्यटन स्थळांपैकी एक बनत आहे. नवी दिल्लीतील फिलीपाईन्स दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांना आता दोन प्रकारच्या अल्पकालीन व्हिसा-मुक्त प्रवेशाचा लाभ घेता येणार आहे.
नव्या नियमानुसार, भारतीय पर्यटकांना दोन वेगवेगळ्या व्हिसा-मुक्त योजनांद्वारे फिलीपाईन्समध्ये प्रवास करता येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय 14 दिवसांसाठी फिलीपाईन्समध्ये राहता येईल. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील, जसे की, मुक्कामानंतर किमान सहा महिने वैध असलेला पासपोर्ट, निवासस्थानाचा पुरावा, पुरेसा निधी (उदा., बँक स्टेटमेंट किंवा रोजगार प्रमाणपत्र), परतीचे तिकीट आणि फिलीपाईन्समध्ये स्वच्छ इमिग्रेशन इतिहास. जे या अटी पूर्ण करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी 9(अ) तात्पुरता पर्यटन ई-व्हिसा उपलब्ध आहे, जो 30 दिवसांच्या सिंगल-एंट्री मुक्कामाची परवानगी देतो.
फिलीपाईन्ससह, भारतीयांना आता एकूण 59 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, इंडोनेशिया (Indonesia), मॉरिशस (mauritius), केनिया (Kenya), झिम्बाब्वे (Zimbabwe), फिजी (fiji), मायक्रोनेशिया (Micronesia), पलाऊ बेटे आणि वानुआतु यांसारख्या देशांचा यात समावेश आहे. विशेषतः आफ्रिकेतील अनेक देश आणि ओशनियातील बेटेही या यादीत आहेत. अंगोला (Angola), बार्बाडोस (barbados), भूतान (Bhutan), कंबोडिया (cambodia), मालदीव (maldives), श्रीलंका (shri lanka), थायलंड (Thailand) यांसारखे देशही भारतीय पर्यटकांचे स्वागत व्हिसाशिवाय करतात.
या संधीमुळे भारतीय पर्यटकांना जगभरातील विविध संस्कृती, निसर्ग आणि साहस अनुभवणे अधिक सोपे झाले आहे. मग वाट कसली पाहता? तुमचा पासपोर्ट तयार ठेवा आणि या 59 देशांपैकी तुमच्या आवडीच्या ठिकाणी भटकंतीला निघा!