कोरफड (Aloevera Gel) ही आपल्या घराघरात सहजपणे आढळणारी आणि कोणत्याही औषधी कपाटात हवीच अशी वनस्पती आहे. दिसायला साधी वाटणारी ही वनस्पती खरंतर एक बहुगुणी औषध आहे. अँटिऑक्सिडंट्स, दाह कमी करणारे गुणधर्म आणि विविध नैसर्गिक संयुगांनी परिपूर्ण असलेली कोरफड आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अमूल्य ठरते. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळा अशा बदलत्या ऋतूंमध्ये कोरफडीचा उपयोग अधिक प्रभावी होतो.
त्वचेच्या आरोग्यासाठी अमृततुल्य
उन्हामुळे झालेली सनबर्न, लहान-मोठ्या जखमा, किंवा जळजळ कोरफडीचा थंडावा आणि तिच्या जेलमधील उपचारात्मक गुणधर्म यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. जळालेल्या जागी थेट कोरफडीचा गर लावल्यास त्वरीत आराम मिळतो आणि फोड येण्यापासूनही बचाव होतो. हळदीसोबत कोरफड मिसळून लावल्यास संसर्गाचा धोका कमी होतो आणि जखम लवकर भरून येते.
केसांची नैसर्गिक देखभाल
कोरफड केसांना मऊ, चमकदार आणि निरोगी बनवते. तिच्या जेलचा उपयोग कंडिशनरप्रमाणे करता येतो. नियमित वापराने केस गळणे कमी होते आणि डोक्याच्या त्वचेत होणारी जळजळ किंवा खवखवही कमी होते.
आरोग्यासाठी वरदान
कोरफडीचा रस थोडा कडवट असला, तरी तो शरीरासाठी एक उत्तम टॉनिक आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरफड प्रभावी ठरते. त्वचेचा नैसर्गिक तेज राखण्यासाठी आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी कोरफडीचा रस उपयोगी आहे. मात्र, घरी तयार केलेला कोरफडीचा रस अपायकारक ठरू शकतो, त्यामुळे नेहमी विश्वासार्ह ब्रँडचा रस वापरणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
दात व हिरड्यांचे रक्षण
दातांची निगा राखण्यासाठी देखील कोरफड उपयोगी आहे. कोरफडयुक्त टूथपेस्ट वापरल्यास तोंडातील दुर्गंधी, हिरड्यांची जळजळ आणि दातांवरील किड यावर प्रभावी उपाय होतो. तसेच कोमट पाण्यात कोरफडीचा रस मिसळून माउथवॉशप्रमाणे वापरल्यास हिरड्यांचे आरोग्य सुधारते.
स्नायू वेदनांवर घरगुती उपचार
कधी कधी घरकाम करताना पाय किंवा हात दुखावतो. अशा वेळी कोरफडीच्या पानावर मोहरीचे तेल लावून ते गरम करून दुखत असलेल्या भागावर लावल्यास आणि पट्टी बांधल्यास वेदना आणि सूज कमी होतात. ही एक पारंपरिक पण अजूनही प्रभावी अशी घरगुती पद्धत आहे.
निसर्गाची देणगी, काळजीपूर्वक वापरा
कोरफड जरी बहुगुणी असली तरी तिचा वापर करताना योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. विशेषतः आतून सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.