सध्या उन्हाळ्याचा प्रचंड कहर जाणवत असून, अनेक भागांमध्ये तापमान 50 अंशांवर पोहोचले आहे. अशा उष्णतेत AC हेच एकमेव आरामदायक साधन झाले आहे. त्यामुळे घरामध्ये 20-24 तास AC चालू ठेवण्याची वेळ येते. पण सतत वापरामुळे AC मध्ये स्फोट होण्याच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर जीवितहानीचाही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः अनियमित देखभाल आणि वेळोवेळी सर्व्हिस न केल्यामुळे हे अपघात होण्याची शक्यता वाढते. AC अचानक स्फोट होत नाही, त्याआधी तो काही स्पष्ट संकेत देतो. हे संकेत ओळखले तर मोठा धोका टाळता येतो.
- असामान्य आवाज:
AC सामान्यपणे शांतपणे चालतो, पण जर त्यातून विचित्र, खडबडीत किंवा वारंवार येणारा आवाज येत असेल, तर ही गंभीर चेतावणी असते. आवाज म्हणजे कॉम्प्रेसरवर ताण, आतील घटकात अडथळा किंवा वायरिंगमध्ये दोष असण्याची शक्यता. याकडे दुर्लक्ष केल्यास स्फोट होऊ शकतो. - AC च्या शरीराला उष्णता:
सामान्य स्थितीत AC स्वतः थंड राहतो. पण जर तुम्हाला बाहेरील युनिट किंवा इनडोअर युनिट खूप गरम वाटत असेल, तर ही धोक्याची सूचना आहे. याचा अर्थ म्हणजे यंत्रणेतील उष्णता बाहेर पडत नाही आणि त्यामुळे यंत्रणा ओव्हरहीट होऊन स्फोट होण्याची शक्यता निर्माण होते. - कूलिंगमध्ये घट:
AC चालू असूनही जर खोली योग्य थंड होत नसेल, विशेषतः थोड्याच वेळात कूलिंग कमी जाणवत असेल, तर याचा अर्थ AC च्या रेफ्रिजरंट गॅसची पातळी कमी झाली आहे किंवा कंप्रेसर बिघडला आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येतो आणि स्फोटाचा धोका निर्माण होतो. - अचानक थांबणं व हवा कमी होणं:
जर AC काही वेळाने थांबत असेल किंवा त्याची हवा येणं थांबत असेल, तर हे कंप्रेसरमध्ये गंभीर बिघाडाचं लक्षण असू शकतं. सतत अशा स्थितीत चालू ठेवल्यास त्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो. - मोड काम करत नसणे:
AC मध्ये विविध मोड असतात, जसे की कूल, ड्राय, स्लीप, टर्बो, फॅन इ. हे मोड योग्य प्रकारे काम करत नसल्यास, AC चा कंट्रोल पॅनल बिघडलेला असतो. ही इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत अडचण असून, त्यातून शॉर्टसर्किट किंवा आग लागण्याची शक्यता असते.
उष्णतेच्या झळा टाळण्यासाठी AC वापरणं गरजेचं असलं तरी, त्याची योग्य देखभाल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दर 3-6 महिन्यांनी AC सर्व्हिसिंग करावं, फिल्टर वेळेवर स्वच्छ करावेत, आणि कोणतेही अनैसर्गिक लक्षण आढळल्यास AC तज्ञांचा सल्ला घ्यावा. सतर्क राहून तुम्ही तुमचं घर सुरक्षित ठेवू शकता.