बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांचं बालपण किंवा कुटुंब भारतीय लष्कराशी घट्टपणे जोडलेलं आहे. त्यांचं जीवन केवळ ग्लॅमरपुरतं मर्यादित न राहता, त्यामागे शौर्य, बलिदान आणि देशसेवेची प्रेरणादायी कहाणी असते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे निमरत कौर, जिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली, पण तिच्या आयुष्यात एक हृदयद्रावक घटना आहे – तिच्या वडिलांचं देशासाठी दिलेलं बलिदान.
निमरत कौरचे (Nimarat kaur) वडील मेजर भूपेंद्र सिंह (Bhupendra singh) हे भारतीय लष्करातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते. 1994 साली काश्मीरमधील वेरीनाग येथे ते तैनात होते. त्यावेळी काश्मीरमध्ये दहशतवादी हालचाली जोरात होत्या. जानेवारी महिन्यात हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये निमरत आणि तिचं कुटुंब त्यांना भेटण्यासाठी गेलेलं असताना, हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने मेजर सिंह यांचं त्यांच्या पोस्टवरून अपहरण केलं. सात दिवसांच्या तावडीत ठेवल्यानंतर, त्यांनी सरकारकडून काही दहशतवाद्यांची सुटका मागितली. पण मेजर सिंह यांनी कोणतीही दहशतवादी मागणी मान्य केली नाही. त्यांचा निश्चय पाहून त्या अतिरेक्यांनी त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. तेव्हा त्यांचं वय फक्त 44 वर्षं होतं आणि निमरत होती केवळ 12 वर्षांची.
एका मुलाखतीत निमरत कौरने सांगितलं की, “मी वडिलांचं पार्थिव पहिल्यांदा दिल्लीत पाहिलं. ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक होते.” देशासाठी आपल्या वडिलांनी दिलेलं बलिदान तिच्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे.
निमरतने अभिनय कारकिर्दीत ‘एअरलिफ्ट’, ‘दसवी’, ‘साजन शिंदे का व्हायरल व्हिडिओ’, ‘स्काय फोर्स’ यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच अलीकडेच प्रदर्शित झालेली तिची ‘कुल’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या अभिनयामध्ये एक प्रकारची सच्चाई आणि ताकद दिसून येते – कदाचित तिच्या आयुष्यातील वास्तवातील संघर्षामुळे ती अधिक प्रभावीतेने पात्रं साकारते.
काही काळापूर्वी तिचं नाव अभिनेता अभिषेक बच्चन सोबतही जोडलं गेलं होतं, पण या चर्चा काही काळातच विरल्या. निमरत कौर ही फक्त एक अभिनेत्री नाही, तर ती एक शहीद सैनिकाची मुलगीसुद्धा आहे. तिच्या वडिलांचं बलिदान आणि तिचा स्वतःचा संघर्ष प्रेरणादायी आहे. तिची कहाणी ही फक्त ग्लॅमरची नाही, तर देशभक्ती आणि धैर्याची आहे.