कधी घराघरात आजीबाईंच्या गोष्टींमध्ये ऐकू येणारा, तर कधी घरगुती उपायांमध्ये सीमित असलेला आयुर्वेद, आता नव्या शास्त्रीय अधिष्ठानासह पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवत आहे. पतंजली, डाबर, हिमालय आणि सन हर्बल्स यांसारख्या आयुर्वेदिक कंपन्यांनी पारंपरिक औषधशास्त्राला विज्ञानाच्या कसोटीवर तपासून लोकांचा विश्वास पुनर्स्थापित केला आहे.
पतंजलीने त्यांच्या संशोधन संस्थेमार्फत विविध औषधी वनस्पतींच्या परिणामकारकतेवर संशोधन केले असून, अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कोरोना काळातील ‘कोरोनेल’पासून ते अलीकडील ‘ब्रॉनकॉम’ औषधापर्यंत, कंपनीने मायक्रोप्लास्टिकमुळे होणाऱ्या फुफ्फुसांच्या नुकसानीवर परिणामकारक उपाय सुचवले आहेत, ज्याची नोंद ‘Biomedicine & Pharmacotherapy’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये झाली आहे.
डाबरने आपल्या च्यवनप्राश आणि मधाच्या गुणधर्मांव वैज्ञानिक पातळीवर चाचण्या घेतल्या असून, त्यांच्या निष्कर्षांचे पारदर्शक सादरीकरण ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणारे ठरले आहे. याच धर्तीवर हिमालय कंपनीने आयुर्वेद आणि अॅलोपॅथी यांचा मिलाफ साधत ‘Liv 52’ आणि ‘Septilin’ यांसारखी उत्पादने विकसित केली, ज्यांची शिफारस वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे केली जाते.
ग्रामीण भागातील कुटुंबांपासून ते शहरी तरुणांपर्यंत, रसायनमुक्त आरोग्यदायी जीवनशैलीकडे झुकाव वाढत चालला आहे. सोशल मीडिया, आरोग्यविषयक यूट्यूब चॅनेल्स आणि डिजिटल हेल्थ इन्फ्लुएंसर्स यांच्या मार्फत लोकांपर्यंत वैज्ञानिक आधारासह आयुर्वेदिक माहिती पोहोचत आहे.
आजचा आयुर्वेद म्हणजे केवळ परंपरेवर आधारित उपचार पद्धती नव्हे, तर विज्ञानाधारित, संशोधनप्रधान आणि जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारी एक सशक्त वैद्यकीय प्रणाली आहे.