भारतीय क्रिकेटला नुकताच एक मोठा धक्का बसला आहे. देशाचे दोन दिग्गज फलंदाज – रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आता विराट कोहली (Virat Kohli) यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितने काही दिवसांपूर्वीच कसोटीतून एक्झिट घेतल्यानंतर, कोहलीचाही निरोप क्रिकेटप्रेमींना भावनिक करून गेला. विराट कोहलीने आपल्या निर्णयाची माहिती बीसीसीआयला (BCCI) दिली असून, इंग्लंड दौऱ्यात त्याच्या सहभागाची शक्यता अत्यंत धूसर आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कोहलीला निवृत्तीचा निर्णय पुन्हा विचारात घेण्याचे आवाहन केले आहे.
कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) केली होती. सुरुवातीला विशेष काही चमक दाखवता आली नव्हती, मात्र पुढे जाऊन त्याने भारतीय संघाचा कणा बनत एक जबरदस्त फलंदाज म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याने एकूण 123 कसोटी सामन्यांत 9230 धावा केल्या, 30 शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली. त्याची सरासरी होती 46.85. त्याने शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी येथे खेळला, जिथे त्याला मोठी कामगिरी करता आली नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत पर्थ कसोटीत त्याने एकमेव नाबाद शतक झळकावले होते, परंतु नंतरच्या डावांमध्ये तो फारशी धावा करू शकला नाही. त्या मालिकेत त्याने 5 सामन्यांतील 9 डावांत केवळ 190 धावा केल्या, सरासरी होती 23.75.
विराटच्या आधी रोहित शर्मानेही 7 मे रोजी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर रोहित आणि कोहली दोघांनीही सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा केले होते. त्यामुळे आता ही ROKO जोडी (रोहित आणि कोहली) फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच दिसून येणार आहे. सध्या आयपीएल स्पर्धा भारत-पाकिस्तान तणावामुळे स्थगित झाली आहे. त्यामुळे दोघेही काही काळ मैदानापासून दूर आहेत.