22 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरच्या (Jammu kashmir) पहलगाममध्ये (Pahagam) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ठोस प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर (Operetion Sindoor) ’ या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांचे नऊ तळ क्षेपणास्त्रांद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर, बॉलीवूडही या ऐतिहासिक सैनिकी कारवाईकडे लक्ष वेधत आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA), इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स कौन्सिल (IFTPC), आणि वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन (WIFPA) यांच्याकडे ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित चित्रपट शीर्षकांची नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.
IMPPA चे सचिव अनिल नागरथ यांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘मिशन सिंदूर’, ‘सिंदूर का बदला’ आणि ‘हिंदुस्तान का सिंदूर’ यांसारख्या 30 पेक्षा जास्त टायटल्ससाठी अर्ज आले असून, ही संख्या लवकरच 50-60 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ‘पहलगाम अटॅक’ आणि ‘पहलगाम: द टेरर अटॅक’ यांसारख्या नावांवरही निर्मात्यांची पसंती आहे.
यापूर्वी ‘उरी (Uri): द सर्जिकल स्ट्राइक’सारख्या चित्रपटांनी देशभक्ती आणि लष्करी कारवाईवर आधारित सिनेमांना प्रचंड यश मिळवून दिलं. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित चित्रपट येणं केवळ अपेक्षितच नाही, तर ते रुपेरी पडद्यावर देशाच्या लष्करी शौर्याची साक्ष देणारं अजून एक पर्व ठरेल, अशीच निर्मात्यांची भावना दिसून येते.