गेल्या वर्षी विधानसभा निवडणूकीपुर्वी राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी आता सुरु करण्यात आली आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या पाच लाखांनी घटलेली बघायला मिळाली आहे. या फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील 55 हजारांपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर, दुसरीकडे मराठवाड्यातीलच 54,498 महिलांचे अर्ज अद्यापही मंजूर झालेले नाहीत.
मराठवाडा विभागात एकूण 21 लाख 97 हजार 211 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. मराठवाड्यातून एकूण 23 लाख 7 हजार 184 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21 लाख 97 हजार 211 अर्ज वैध ठरले व त्यांना योजनेचा लाभ देखील मिळाला. मात्र, 54 हजार 598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत.
महाराष्ट्र सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर या योजनेतील अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरु केली होती. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये राज्य सरकारने 2 कोटी 46 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वाटप केले होते. शिवाय जानेवारीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 2 कोटी 41 लाख महिलांना दिला गेला होता. याचा अर्थ 5 लाख लाभार्थी महिला त्या महिन्यात कमी झाल्या होत्या. त्यामधील काही महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या होत्या हे समोर आले होते. यानंतर काही महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची देखील संख्या कमी झाली. शिवाय अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या किंवा चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला अर्जदारांची नावेही कमी करण्यात आली होती.
Sanjay Raut : आम्ही जर रस्त्यावर आलो तर….संजय राऊतांचा इशारा
मराठवाडा विभागात एकूण आठ जिल्हे आहेत. यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेडचा समावेश होतो. पैकी छत्रपती संभाजीनगरमधील 6655, धाराशिवमधील 2533, लातूरमधील 8001, जालनातील 9622, हिंगोलीमधील 5825, परभणीतील 2802,बीडमधील 9364, नांदेडमधील 10532 महिला अर्जदारांचा लाभ बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.