20.4 C
New York

Sharad Pawar Security : शरद पवारांनी नाकारली झेड प्लस सुरक्षा; CRPF अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Published:

नवी दिल्ली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक (Assembly Elections) केव्हा जाहीर होणार हे अजून स्पष्ट नाही, मात्र दिल्लीपासून मुंबई-पुण्यापर्यंत राजकारणाने वेग पकडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा (Z+ Security) देण्याचा निर्णय घेतलाय. पवार यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ (CRPF) जवानांची तुकडी तैनात केली जाणार आहे. शरद पवार यांनी आधीच या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आज शरद पवार यांची दिल्लीत सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत पवारांनी झेड प्लस सुरक्षेच्या (Sharad Pawar Security) काही अटींना हरकत घेतली आहे. त्यामुळेच शरद पवार ही सुरक्षा नाकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, मात्र त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वांचेच राज्यभरात दौरे सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौऱ्यावर असतात. मात्र, राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. कारण, मध्यंतरी पवारांच्या ताफ्याला आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या निवासस्थानी  सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली, यावेळी आपल्याला अतिरिक्त सुरक्षेची गरज नसल्याचे सांगत त्यांनी सुरक्षा व्यवस्था परत केली. तसेच, जी काही सुरक्षा द्यायची असेल तर  घराबाहेर द्या. पण गाडी बदलणे आणि गाडीत दोन सुरक्षा रक्षक असणे, याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शरद पवार यांना एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था का पुरवण्यात येत आहे. यासंदर्भातही कोणतेही ठोस कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले नाही. या सुरक्षेबाबत शरद पवार स्वत:च अनभिज्ञ  आहेत. शरद पवार यांच्या जिवाला धोका असलेली अशी कोणती माहिती सुरक्षा व्यवस्थेकडे आहे. याबाबतही शरद पवार यांना कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे आपल्याला एवढ्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेची गरज नसल्याचे सांगत त्यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे.

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या झेड प्लस सुरक्षेवर पवारांनी पहिल्या दिवसापासून तिरकस टिप्पणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी कुठे जातो, कोणाला भेटतो, याची माहिती घेण्यासाठी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असेल, असे पवार म्हणाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img