10.6 C
New York

Ashadhi Wari : शिवछत्रपतींच्या पादुकांचे शिवनेरीहून पंढरपूरला प्रस्थान

Published:

रमेश तांबे, ओतूर

भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी (Shivchhatrapatis Padukas) शिवजन्मभूमी शिवनेरीहून प्रस्थान केले आहे. श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने सोमवार दि.1 रोजी प्रस्थान केले. श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रूद्राभिषेक झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक 1 हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या ३५० व्या वर्धापन वर्षात शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका मंचर,खेड, पुणे मार्गे श्री शंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात विसावा घेतील.राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्साहाने आलेले शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन, प्रस्थान पूजा करून नारायणगाव मार्गे तालुक्यातून पुढे गेले.

श्री शिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ.संदीप महिंद गुरूजी याप्रसंगी बोलताना म्हणाले की,आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. तेथून ‘नाम घेता वाट चाली || यज्ञ पाऊला पाऊली |l या भावाने पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे दहावे वर्ष तर परंपरेचे तिसावे वर्ष आहे.

शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी कृष्णा भोसले, शंकर ढोमसे, विजय बोळीज, श्रवण अरबोळे, संकेत गायकवाड, रामनाथ ढोमसे यांच्या गटाला मिळाली आहे. सोहळा यशस्वी करण्यासाठी संदीप ताजणे, हर्षवर्धन कुर्हे, अक्षय कुटे यांनी परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री जंगले,मंगेश बोचरे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपान दुराफे, जुन्नर वनविभागाचे  उपवनसंरक्षक अमोल सातपुते तसेच वन कर्मचारी,स्थानिक मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img