खाणे आणि आरोग्य यांचे अतूट नाते आहे. केवळ पोषणयुक्त अन्न खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहील, असे नाही, तर ते योग्य प्रकारे, योग्य वेळेस आणि योग्य मानसिकतेत खाल्ले गेले पाहिजे. योगगुरु बाबा रामदेव (Yogguru Baba Ramdev) आणि आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्ण (Balkrushna) यांनी त्यांच्या ‘द सायन्स ऑफ आयुर्वेदा’ (The Science Of Ayurveda)या पुस्तकात खाण्याच्या सवयींबाबत सखोल माहिती दिली आहे. या पुस्तकात नमूद केलेले नियम पाळल्यास शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजार टाळता येतात.
या पुस्तकानुसार, नेहमी ताजे आणि गरम अन्न खाणे आरोग्यास पोषक ठरते. थंड व शिळे अन्न पचायला जड असून, त्याचा विपरीत परिणाम होतो. अन्नाची मांडणी नीटस आणि आकर्षक असावी, जेणेकरून भूक उत्तेजित होते आणि पाचक रस निर्माण होतात. जेवणाची जागा स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असावी. अशा वातावरणात मन प्रसन्न राहतं आणि जेवणाचा पुरेपूर लाभ मिळतो. जेवताना पायात जोडे नसावेत, जेणेकरून शरीराची उष्णता योग्य प्रमाणात राहते आणि पचनक्रिया सुरळीत होते.
तसेच, मानसिक स्थिती देखील आनंदी असावी. चिंता, राग किंवा नकारात्मक भावना यामुळे पाचनावर वाईट परिणाम होतो. जेवणाच्या आधी आणि नंतर हात-पाय स्वच्छ धुणे, प्रार्थना करणे आणि जे अन्न मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे या गोष्टी मनाला आणि शरीराला संतुलनात ठेवतात. आयुर्वेदानुसार दुपारी १२ ते २ आणि रात्री लवकर हलके जेवण करणे आरोग्यास लाभदायक ठरते.
या सर्व सवयी अंगीकारल्यास केवळ आरोग्य सुधारते असे नाही, तर मन आणि शरीर दोन्हीही सशक्त आणि तंदुरुस्त राहते. आधुनिक जीवनशैलीतही या पारंपरिक आणि वैज्ञानिक आयुर्वेदीय सल्ल्यांचे पालन केल्यास निरोगी आयुष्य सहज शक्य आहे.