बॉलिवूडमध्ये अनेक नामवंत कलाकार आपल्या खाजगी आयुष्यातील संघर्ष उघड करत असतात. अशाचप्रकारे अभिनेता प्रतीक बब्बरने (Pratik Babber) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंग उघड केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील (Smita patil) आणि राज बब्बर (Raj Babber) यांचा मुलगा असलेला प्रतीक बब्बर याने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ड्रग्सच्या व्यसनाविषयी खुलासा केला आहे.
प्रतीकने सांगितले की, तो एक काळ असा होता जेव्हा त्याचे आजी-आजोबांनी त्याचे सर्वात वाईट रूप पाहिले. इतकंच नाही तर त्यांच्या मृत्यूवेळीही तो नशेत होता, ही गोष्ट आजही त्याच्या मनाला बोचते. तो म्हणतो, “आज ते असते, तर मी काय बदललो आहे हे पाहून त्यांना समाधान मिळालं असतं.” प्रतीकने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने व्हिस्लिंग वूड्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पण त्या काळात तो ड्रग्जच्या विळख्यात अडकला होता. त्याच कारणामुळे संस्थेने त्याला बाहेर काढलं. तो म्हणतो, “माझं संपूर्ण शिक्षण काही ना काही कारणाने अपूर्ण राहिलं. मी लोकांसाठी धोकादायक ठरत होतो.”
आज मात्र प्रतीक बब्बर पूर्णतः बदललेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी (Priya Banerjee) हिच्यासोबत विवाह केला. सध्या तो वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नवे अध्याय सुरू करत आहे. प्रतीकची ही प्रामाणिक कबुली अनेक तरुणांसाठी शिकवण ठरू शकते. आपल्या चुका स्वीकारून नव्याने सुरुवात करणं, हेच त्याच्या जीवनकथेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे.