राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Maharashtra Local Body Elections) पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुका महायुती एकत्रित लढणार असल्याचे नेते सांगत आहेत. मात्र, याआधी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यानिमित्त आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे बीडमध्ये (Sunil Tatkare) होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या निवडणुकीबाबत महत्वाचा खुलासा केला. यावेळी आमदार धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
तटकरे पुढे म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने एकत्रित लढाव्यात असे ठरले आहे. परंतु, हे ठरवत असताना राज्यातील विविध मतदारसंघांतील महापालिका क्षेत्रांतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे याचा आढावा महायुतीतील घटकपक्षांनी स्वतंत्रपणे घ्यावा. निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती अभेद्य ठेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा न्याय देता येईल याबाबत धोरण ठरवण्यात येईल. आठ ते नऊ जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल स्थिती असल्याचे अनुभवास आले.
Sunil Tatkare विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चा नाही
अजित पवार चाचपणी करत आहेत हे मला आपल्यामार्फत (प्रसारमाध्यमे) पहिल्यांदाच ऐकत आहे. तशी चाचपणी करण्याचं काही कारण नाही. कोअर कमिटीच्या बैठकीत किंवा तसा प्रस्तावही कधी आला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा या फक्त माध्यमांत सुरू असलेल्या चर्चा आहेत असे सुनील तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
अजितदादा पालकमंत्री असताना प्रशासनावरील त्यांचा वकूब कधी कमी झालेला नाही. प्रश्न मांडणं हा आमदारांचा अधिकार आहे. या जिल्ह्यात (बीड) एक अपवाद सोडला तर सर्व आमदार सत्तारुढ पक्षांचे आहेत. मला असं वाटत नाही की विधानसभा सदस्याने मागितलेली बैठक अधिकाऱ्याने बोलावली नाही. जर असे काही असेल तर त्याची माहिती विधानसभा सदस्याकडून घेईल आणि त्या संदर्भात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील.
Sunil Tatkare महायुती म्हणून लढणार पण..
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला महायुती म्हणून लढायच्या आहेत. दीर्घकाळ आम्ही वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात लढत आलो ही गोष्ट आमच्यातील कुणीही नाकारत नाही. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही निवडणुकांत खूप अंतर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चुरस असते. याबाबतीत स्थानिक नेत्यांची मते विचारात घेऊ. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि पुढील वाटचाल ठरवतील. या निवडणुकीसंदर्भात स्थानिक पातळीवर दोन मतप्रवाह आहेत. काही जणांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याचेही मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे सर्वांची मते विचारात घेऊन पुढील वाटचाल ठरवली जाईल, असे तटकरे म्हणाले.