राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात माझ्याकडे माहिती आहे असा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार अस्थिर करण्यासह घटक पक्षांत वाद निर्माण करुन देण्याचे तर हे प्रयत्न नाहीत ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Sanjay Raut नेमकं काय म्हणाले संजय राऊत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वगळण्याची सूचना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. यासंदर्भात माझ्याकडे माहिती आहे. शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्र्यांना वेळ नाही. पण ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. छत्तीसगडमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली तशी आपल्याकडे होत नाही. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत साडेसहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील कृषिमंत्री शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात नाहीत. त्यांच्याकडे वेळ नाही आणि अशा आमदारांना राज्याचं कृषिमंत्री पद दिलं आहे.