कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केला आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळून लावले, पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी माहिती आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ‘काल हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण याबाबत मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे असंही ते म्हणाले.
कुणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण शिंदेंचं जे सरकार आलं, जी काही सत्तापालट झाली, ती सीडीमुळे झाली. एवढं मोठं ते प्रकरण आहे’, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. ‘जे काही अधिकारी आहेत. आजी – माजी मंत्री आहेत. यात खूप बड्या व्यक्तींचा समावेश आहे. यावर अधिक बोलण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.
जेव्हा दाखवू तेव्हा तिकीटच लावावं लागेल. तिकीट लावूनच चित्र दाखवावं लागेल’, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचेच नेते नाना पटोले यांनी काल विधानसभेत हनी ट्र्रॅपचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसं काही घडलं नसल्याचं सांगितलं.