साल 2000 साली आमिर खान (Amir Khan) आणि ट्विंकल खन्ना यांचा ‘मेला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही, मात्र त्यातील एक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात ठसलेलं आहे आणि ते म्हणजे डाकू गुज्जर सिंग! काळ्या काजळाने सजलेले डोळे, अंगावर काटा आणणारा चेहरा आणि रूपावर केलेले क्रूर अत्याचार हे सर्व ‘मेला (Mela)’मधील भीतीदायक क्षण प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. हे पात्र साकारलं होतं अभिनेता टीनू वर्मा यांनी जे त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत धोकादायक खलनायकांमध्ये गणले जायचे.
टीनू वर्मा हे केवळ अभिनेताच नव्हते, तर त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणूनही नाव कमावलं आहे. ‘आंखें’ (1993) मधून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर ‘घातक (Ghatak)’, ‘राज(Raaz)’, ‘माँ तुझे सलाम’ (Maa Tujhe Salam), ‘हिम्मत (Himmat)’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. मात्र काही काळातच ते रुपेरी पडद्यावरून अचानक गायब झाले.
अगदीच गूढतेने दूर गेलेले टीनू वर्मा (Teeenu Verma) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले पण या वेळी कारण होते धक्कादायक. ऑगस्ट 2013 मध्ये टीनू वर्मावर आरोप करण्यात आला की त्यांनी आपल्या सावत्र भाऊ मनोहर वर्मावर गोरेगावमधील एका फार्महाऊसच्या संपत्तीच्या वादातून तलवारीने हल्ला केला. वाद इतका टोकाचा गेला की मनोहरला रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेनंतर टीनू वर्मा यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय बनलं.
सध्या टीनू वर्मा बॉलिवूडपासून दूर आहेत. मात्र त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीशी कायमसाठी नातं तोडलं असं म्हणता येणार नाही. ते अधूनमधून इन्स्टाग्रामवर सक्रिय राहतात आणि आपल्या जुन्या आठवणी, अनुभव शेअर करताना दिसतात. काही पॉडकास्ट शोमध्येही ते हजेरी लावत असून, आपल्या कारकिर्दीतील संघर्ष, संघर्षानंतरचं जीवन आणि बॉलिवूडमधील अनुभवांवर प्रामाणिकपणे बोलताना पाहायला मिळतात.
टीनू वर्मा यांचं आयुष्य हे एका कालखंडात चित्रपटांतील भीतीदायक खलनायक म्हणून, तर दुसऱ्या टप्प्यावर रिअल लाईफ वादांमुळे गाजलेलं आहे. त्यांच्या अभिनयाची छाप आजही ‘मेला’सारख्या चित्रपटामुळे जिवंत आहे, जरी त्यांनी रुपेरी पडद्यावर परतण्याची शक्यता कमी वाटत असली तरी त्यांचा लूक, अभिनय आणि अॅटिट्यूड आजही चाहत्यांच्या मनात जागा मिळवून आहे.