स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लवकरच (Local Body Elections) होणार आहेत. राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक राजकारणाचा कानोसा घेत युती आघाड्यांची बोलणी सुरू आहे. राज्यातील नेतेमंडळीही राजकीय गणित सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी महायुतीने डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुका महायुती एकत्रितच लढणार असे सांगितले जात आहे. यातच आता महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्य पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपण कुठेच कमी नसतो. फक्त प्रयत्न करा. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. पण मनापासून आज आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. कट्टरवाद राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही. भविष्यातही मान्य राहणार नाही. आता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पालिका निवडणुकीसाठी झोकून देऊन काम केलं पाहिजे.
काहीजण सतत बदनामी करत आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 7 लाख कोटी रुपये अर्थसंकल्प जाहीर करताना 41 टक्के निधी आदिवासी समाजाला दिला. पण खोटी माहिती देऊन आरोप केले जातात. यामुळे कार्यकर्ता चलबिचल होतो. यंदा 38 टक्के जास्त निधी मागील वर्षाच्या तुलनेत दिला आहे. मुख्यमंत्री देखील याबाबत बोलले. मात्र, त्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही असंही ते यावेळी म्हणाले.
Ajit Pawar कुणाचाही निधी वळवला नाही
विकास जर राजकारणात राहून करायचा असेल तर सत्ता महत्वाची आहे. फक्त घोषणा देऊन, सत्तेच्या बाहेर राहुन सरकारवर टीका करून या गोष्टी करता येत नाहीत असं म्हणत आपण सत्तेतच असलं पाहिजे या गोष्टीचं समर्थन अजित पवार यांनी केलं आहे. त्यासोबतच आमच्याबद्दल वेगवेगळी टीका होते. आम्हाल काही कारण नसताना विनाकारण बदनाम करण्याचं काम केलं जात. कुणाचाही निधी वळवला अशा बातम्या देऊन टीका केली जाते. मात्र, कुणाचाही निधी आम्ही वळवला नाही असंही अजित पवार म्हणाले.