29.6 C
New York

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला दाखल; कॅलिफोर्निया सरकारनं नेमकं काय केलं?

Published:

अमेरिकेत इमिग्रेशन धोरणाच्या (Donald Trump) विरोधात हिंसाचार (National Guard Controversy) उफाळून आला आहे. कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क शहरांत या हिंसाचाराची तीव्रता जास्त आहे. आंदोलकांनी ठिकठिकाणी जाळपोळ केली आहे. वाहनांना आगी लावल्या आहेत. या आंदोलनांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारची कोंडी झाली आहे. यातच आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातच कॅलिफोर्निया सरकारने (California Govt) थेट खटला दाखल केला आहे.

लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) नॅशनल गार्ड्स सैनिकांची तैनाती राज्यपालांची परवानगी न घेताच केली म्हणून हा खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढलेली हिंसा रोखण्यासाठी नॅशनल गार्ड्सनंतर मरीन तैनात करण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला आहे. यामुळे अमेरिकेत रस्त्यावरील लढाई उच्चपदस्थ अधिकाऱ्यांतही पोहोचली आहे.

राज्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय कायद्याच्या विरुद्ध आहे. यामुळे सध्याची परिस्थिती आणखी चिघळू शकते. अटॉर्नी जनरल रॉब बॉन्टा यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रपती ट्रम्प यांनी त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राज्यात कोणत्याही प्रकारचे बंड किंवा हल्ले झालेले नाहीत. फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प राज्यात संकट आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Donald Trump कॅलिफोर्निया सरकारचं म्हणणं काय?

खटल्यात कॅलिफोर्निया सरकारने म्हटलं आहे की विशिष्ट परिस्थितीत सैन्य तैनात करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. याच अधिकारांचा डोनाल्ड ट्रम्प यांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे. बाहेरच्या शक्तींकडून हल्ला झाला असेल किंवा मोठ्या प्रमाणात विद्रोहाची स्थिती असेल अशाच वेळी सैन्याची तैनाती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. परंतु, राज्यात सध्या अशी कोणतीच परिस्थिती नाही.

Donald Trump वाद नेमका कसा सुरू झाला?

लॉस एंजेलिसमध्ये ट्रम्प सरकारच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात आंदोलन सुरू झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ट्रम्प सरकारने राज्यपालांची परवानगी न घेताच येथे दोन हजार नॅशनल गार्ड्स सैनिकांची नियुक्ती केली. परंतु, गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि अन्य डेमोक्रॅट नेत्यांचं म्हणणं होतं की राज्यातील परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी राज्याचीच आहे यात केंद्राचा हस्तक्षेपाची काहीच गरज नाही.

गव्हर्नर न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनाला एक पत्रही धाडले. लॉस एंजेलिसमध्ये सैनिकांची तैनाती करणे म्हणजे राज्याच्या स्वायत्ततेवर थेट हल्ला आहे. प्रशासनाने हा निर्णय जाणूनबुजून आणि परिस्थिती अधिक चिघळावी यासाठीच घेतला आहे असा आरोप गव्हर्नर न्यूसम यांनी या पत्रातून केला आहे. ट्रम्प सरकारचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या नावे हे पत्र होते.

MSNBC ला दिलेल्या मुलाखतीत न्यूसम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जहरी टीका केली. या सगळ्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आगीत तूप टाकण्याचं काम केलं आहे. हा प्रकार फक्त अवैधच नाही तर अनैतिक आणि असंवैधानिकही आहे. या निर्णयाला आम्ही न्यायालयात नक्कीच आव्हान देणार आहोत. यानंतर कॅलिफोर्निया सरकारने न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img