पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.6) चिनाब रेल्वे पूल आणि अंजी पुलाचे (Chenab Bridge) उद्घाटन करून जम्मू आणि काश्मीरला मोठी भेट दिली. या पुलाच्या उद्घाटनामुळे काश्मीरला जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. एकीकडे या पुलामुळे प्रवास जरी आमदायी होणार असला तरी, दुसरीकडे हा ब्रिज पाकिस्तानसाठी (Pakistan) गळ्याचा फास आणि चीनला टेन्शनमध्ये टाकणारा आहे. हा ब्रिज म्हणजे शेजारील दोन्ही शत्रू राष्ट्रांकडून भारताला वाचवण्यासाठी मोदींनी (Narendra Modi) टाकलेलं हे एकप्रकारचं चक्रव्यूह आहे कसं ते जाणून घेऊया.
Chenab Bridge पाक दहशतवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणजे पीर पंजाल खिंड
पीर पंजाल खिंड ज्याला पीर की गली असेही म्हणतात हा हिमालयाचा विस्तारित भाग आहे. जो काश्मीर खोऱ्याला मुघल रोडने राजौरी आणि पूंछशी जोडतो. मुघल रोडवरील हा सर्वात उंच बिंदू 3,490 मीटर (11,450 फूट) उंचीवर आहे आणि काश्मीर खोऱ्याच्या नैऋत्येस स्थित आहे. काश्मीर खोऱ्यातील खिंडीच्या सर्वात जवळचे शहर शोपियान आहे. पहलगाम हल्ला झालेल्या ठिकाणाला लागून असलेल्या बैसरन खोऱ्यातील जंगलेदेखील पीर पंजालशी जोडलेली आहेत.
आयएसआयने प्रशिक्षित दहशतवादी पीर पंजाल खिंडीतूनच भारतात प्रवेश करतात. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) दहशतवादी याच खिंडीतील जंगलत पळून गेले होते. मात्र, आता चिनाब ब्रिजमुळे पीर पंजाल भागात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे जाळे तुटून पडण्यास मदत होणार आहे.
Chenab Bridge कोणत्याही हवामानात भारतीय सैन्य लडाख सीमेवर त्वरीत पोहचणार
चिनाब नदीवरील रेल्वे ब्रिजमुळे भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या हवामानात लद्दाख सीमेवर सैन्य उपकरणांसह अगदी त्वरेने पोहचू शकणार आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तणावाच्या परिस्थितीत सीमेवर सैन्य आणि हत्यार कमी वेळत दाखल होऊ शकतील.
Chenab Bridge गुप्तचर यंत्रणा आणि देखरेख यंत्रणेचे जाळं बनणार
दहशतवादाला आळा घालण्यासाठी काउंटर टेरर प्लॅनिंग करणे या ब्रिजमुळे सोपे होणार असून, हिमालयातील पीर पंजालमधून होणाऱ्या घुसखोरीला यामुळे आळा बसणार आहे. शिवाय काश्मीर खोऱ्यात प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांवर आणि दहशतवादी घटनांवर जलद सैन्य पाठवता येणार आहे.
या ब्रिजवर चहूबाजूंनी फिरणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे वर्षभर २४ तास देखरेख करता येण शक्य आहे. या ब्रिजच्या बांधकामात अँटी-कॉरोझन तंत्रज्ञान, पॉलिसिलॉक्सेन पेंट, प्रगत स्टेनलेस स्टील आणि फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिक वापरण्यात आले आहे, ज्यामुळे तो बराच काळ टिकेल तसेच बॉम्बस्फोट झाल्यासही याला हानी पोहचणार नाहीये.
Chenab Bridge चिनाब ब्रिज आयफेल टॉवरपेक्षा उंच
लांबी 1315 मीटर, कमानीची लांबी 467 मीटर आणि नदीच्या पात्रापासूनची उंची 359 मीटर असून, याची उंची आयफेल टॉवरपेक्षा अंदाजे 35 मीटर उंच आहे. चिनाब पुलाची उंची 359 मीटर आहे, जी आयफेल टॉवरपेक्षा अंदाजे 35 मीटर जास्त आहे. हा पूल 1315 मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज असून, जो भूकंप आणि जोरदार वारा सहन करू शकेल अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे.
Chenab Bridge चिनाब पुलाशी संबंधित इतर वैशिष्ट्ये
चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचं बांधकाम खोऱ्यातील वातावरणाचा विचार करून करण्यात आलं आहे. उणे -40°C पर्यंत तापमान आणि भूकंपासारख्या अत्यंत बिकट परिस्थितींचा सामना करण्याच्यादृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामावेळी पर्यावरण संरक्षणाच्या उच्च मानकांचे पालन करण्यात आले आहे. याशिवाय, नदी आणि आजूबाजूच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षणाचाही विचार करण्यात आला आहे.