राज्य शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एक विशेष कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून पात्र महिलांना ३० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार असून, त्यावर केवळ १० टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि सावकारांकडून होणाऱ्या व्याजशोषणापासून संरक्षण देणे आहे.
‘ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना’ म्हणून या योजनेला नाव देण्यात आलं असून, सध्या बँकेत पैसे जमा असलेल्या १.३८ लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. बँकेच्या माहितीनुसार, ही योजना विशेषतः कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी डिझाईन करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana कर्जाचे निकष आणि परतफेडीची अट काय?
या योजनेत कर्ज घेण्यासाठी महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे बँकेत पैसे जमा असले पाहिजेत आणि दोन लाभार्थी जामीनदारांची साथ आवश्यक आहे. कर्जाची परतफेड तीन वर्षांत मासिक ९६८ रुपयांच्या हप्त्याने करता येणार आहे. यासाठी बँकेचे ‘ब वर्ग सदस्यत्व’ असणे गरजेचे आहे. व्यवसायाचे व्यवहारही बँकेमार्फतच पार पाडण्याची अट आहे.
कर्ज मर्यादा: ₹30,000
व्याजदर: 10%
परतफेड कालावधी: 3 वर्षे
मासिक हप्ता: ₹968
Ladki Bahin Yojana बचत गटासाठीही खास कर्ज योजना
या योजनेसोबतच, ‘जीएलजी’ कर्ज योजना बचत गटातील महिलांसाठी लागू करण्यात आली आहे. प्रत्येकी ५० हजार रुपयांचे यात सदस्य महिलांना कर्ज मिळू शकते. ही रक्कम ब्यूटी पार्लर, शिलाई मशीन, शेवया मशीन, लहान गिरणी यांसारख्या उद्योगांसाठी वापरता येईल. स्थानिक व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, महिलांनी आपल्या जवळच्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेत जाऊन आधारकार्ड, बँक पासबुक, लाभार्थी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा ठोस प्रयत्न आहे.