मिडल ईस्टमधील युद्धाचा भयानक परिणाम जगभरात (Israel Iran Conflict) जाणवू लागला आहे. इस्त्रायलने हमास आणि हिजबुल्लाच्या म्होरक्यांना ठार केल्यानंतर त्याचा बदला म्हणून काल इराणने इस्त्रायलवर (Iran Attack) मिसाइल हल्ला केला. त्यामुळे आता इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाला तोंड फुटलं आहे. एकाच दिवसात या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवू लागला आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतींनी उसळी घेतली आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या किमतीही (Gold Price) वाढू लागल्या आहेत. भारतात तर सोन्याच्या किंमतींनी थेट 76,500 चाही टप्पा पार केला आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे भाव 2700 डॉलर प्रति औंसच्या जवळ पोहोचले आहेत. तर भारतातील वायदे बाजारात सोन्याचे भावाने नवा विक्रम केला आहे. जाणकारांच्या मते आगामी काही दिवसांत भाव आणखी वाढणार आहेत. भारतात आता सण उत्सवांचे दिवस सुरू आहेत. दसरा आणि दिवाळी तोंडावर आले आहेत. अशातच युद्ध भडकलं आहे. त्याचा परिणाम म्हणून ऐन सणासुदीत इंधन आणि सोने चांदीच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा सण वार भारतीयांच्या खिशाला झटका देणारा ठरणार आहे.
बुधवारी न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोन्याच्या दरात सुमारे 30 डॉलर प्रति औंस वाढ दिसून आली. गोल्ड फ्यूचरचे दर 2694 डॉलर प्रति औंस झाले होते. सध्याच्या परिस्थितीत 2681.40 डॉलर प्रति औंस असे दर आहेत. दुसरीकडे गोल्ड स्पॉटच्या किंमती 2680 डॉलर प्रति औंस झाल्या आहेत. युरोपीय बाजारांकडे नजर टाकली तर गोल्ड स्पॉटच्या किंमती 4.40 युरो प्रति औंस कमी होऊन 2401.77 युरो प्रति औंसवर व्यवहार करत आहे. ब्रिटीश बाजारात गोल्ड स्पॉटच्या किंमतीत 3 पाउंड प्रति औंस घटीसह 2001.28 पाउंड प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहेत. या सध्याच्या किंमती आहेत यामध्ये आणखी चढ उतार होऊ शकतो.
इराण-इस्रायलमध्ये भारताचा खास कोण?
Gold Price भारतात सोने 76500 पार
भारतात तर सोन्याच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. देशात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे भावात तेजी दिसून आली. सध्या सोन्याने 76,500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर सोन्याचे भाव 779 रुपये प्रति तोळा तेजीत होते. त्यानंतर व्यवहाराच्या सत्रात सोन्याचे भाव 76,589 रुपये प्रति तोळाच्या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. या वर्षात सोन्याच्या दराने गुंतवणूकदारांना 21 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
Gold Price 80 हजारांचा टप्पा पार होणार?
आता प्रश्न असा आहे की येणाऱ्या काही दिवसांत भारतात सोन्याचे भाव 80 हजारांचा टप्पा पार करणार का. माहितीनुसार या वर्षात शेवटपर्यंत सोन्याचे भाव 80 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये करन्सी कमॉडिटीचे प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले की जियो पॉलिटिकल टेन्शनमुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. आगामी काळात या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.