13.2 C
New York

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मुंबईत 3 हजार मिमीचा टप्पा पार

Published:

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. (Mumbai Rain) बुधवारी (ता. 25 सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे तर मुंबईत पुन्हा 26 जुलैची पुनरावृत्ती होते का? अशी चिंता मुंबईकरांना सतावू लागली होती. पण अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. सर्वाधिक पावसाची नोंद पण मुंबई उपनगरांमध्ये गुरुवारी (ता. 26 सप्टेंबर) रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. 27 सप्टेंबर) सायंकाळी 06 वाजेपर्यंत करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबई उपनगरामधील मालाड या भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून मुंबईत यंदाच्या पावसाने तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी, सांताक्रूझ या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी हे तीन दिवस शहरात आणि उपनगरांमध्ये पावसाने झोडपून काढले आहे. काही काही मिनिटांच्या फरकाने काळाकुट्ट अंधार होऊन पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. नागरिकांची ज्यामुळे तारांबळ उडत आहे. पश्चिम उपनगरात दहीसर, बोरिवली पट्ट्यात पावसाचा असाच काहीसा लपंडाव पाहायला मिळत आहे. तरसायनपासून कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, विद्याविहार, घाटकोपर, देवनार, चेंबूरसह पूर्व उपनगरांमध्ये लगतच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा 12 नंतर जोरदार बरसताना पाहायला मिळत आहे.

Mumbai Rain उपनगरात किती मिमी पाऊस?

मालाड 110 मिमी, डोंबिवली 100 मिमी, मुंब्रा 100 मिमी, घणसोली 93 मिमी, आरे कॉलनी 93 मिमी, गोरेगाव 91 मिमी, मीरा रोड 85 मिमी, वांद्रे 81 मिमी, सांताक्रूझ 80 मिमी, माटुंगा 80 मिमी, मुलुंड 78 मिमी, सायन 78 मिमी, चेंबूर 78 मिमी, कोपरखैरणे 77 मिमी, कल्याण 76 मिमी, परेल 76 मिमी, घाटकोपर 75 मिमी, बोरिवली 72 मिमी, कांदिवली 72 मिमी, ठाणे 71 मिमी, सीबीडी बेलापूर 71 मिमी, अंधेरी 60 मिमी, शिवडी 57 मिमी, वडाळा 51 मिमी, दादर 51 मिमी

हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी याबाबत माहिती देत म्हटले की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता विरून गेले आहे. कमी दाबाचे क्षेत्र आता पालघरच्या वरील भागात निर्माण झाले आहे. त्यामुळे पालघर, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह लगतच्या परिसरात पाऊस पडतो आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img