अंबरनाथ :- अंबरनाथच्या नवीन बायपास रस्त्यावर गोविंद तीर्थ पुलाजवळ सोमवारी (Ambernath Accident) सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडवली. या अपघातात दुचाकीस्वाराने चुकीच्या दिशेने डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना आपला जीव धोक्यात घातला. सुदैवाने, अपघात भीषण असला तरी दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नवीन बायपास रस्त्याकडील सिग्नलवर काही वाहनं थांबलेली होती. सिग्नल सुटल्यानंतर वाहनं पुढे निघू लागली. त्याचवेळी यश इंटरप्रायझेस या कंपनीचे दोन रिकामे डंपर शिवमंदिराच्या दिशेने वळण घेत होते. एका दुचाकीस्वाराने या डंपरला चुकीच्या दिशेने, म्हणजे डाव्या बाजूने, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीस्वाराने अंदाज न आल्याने तो डावीकडे वळण घेत असलेल्या डंपरच्या मागच्या चाकाखाली आला आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.
आरबीआयने दिला सुखद धक्का, युपीआय पेमेंटविषयी घेतला मोठा निर्णय
अपघातात दुचाकी डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने ती पूर्णपणे चेंदामेंदा झाली, पण सुदैवाने दुचाकीस्वाराला किरकोळ जखमा झाल्या. अपघातानंतर डंपर चालकाला अपघाताची कल्पना न आल्याने त्याने गाडीखाली अडकलेली दुचाकी काही अंतर फरफटत नेली. यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या वेगवान कार्यवाहीने घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला मदत करण्यात आली. या घटनेमुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि अशा धोकादायक ओव्हरटेकिंग टाळावीत, असं आवाहन केलं आहे.