Shaikh Hasina : बांगलादेशात हिंसाचारामुळे (Bangladesh Violence) राजीनामा दिलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. माझ्या वडिलांसह शहीदांचा अपमान झाला असून मला देशवासियांकडून न्याय हवा, असं माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलंय. दरम्यान, बांगलादेशात हिंसाचार सुरु झाल्यानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला. त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात पलायन केलं. त्यानंतर आता परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर त्यांनी हे विधान केलंय. यासंदर्भात हसीना यांचा मुलगा साजिब यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीयं.
या पोस्टमध्ये हसीना शेख म्हणतात, 15 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय शोक दिवस गांभीर्याने साजरा करण्याचे आवाहन करीत आहे. बगबंधू भवनामध्ये पुष्पहार अर्पण करुन सर्व आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करा. आपल्या राष्ट्राचे जनक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वतंत्र देश म्हणून ओळख मिळवली. जगभर आदरणीय असलेल्या शेख मुजीब यांच्या निषेधात त्यांचा घोर अपमान करण्यात आला, स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या लाखो हुतात्म्यांचा अपमान केला आहे. मला देशवासियांकडून न्याय हवा असल्याचं हसीना शेख यांनी म्हटलंय.
विनेशच्या याचिकेवरील निर्णयाची तारीख पुन्हा बदलली…
तसेच जुलै महिन्यापासून आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड, हिंसाचार आणि जाळपोळ सुरू आहे, या हिंसाराचामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले शिक्षक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, पोलीस महिला, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य लोक, अवामी लीगचे कार्यकर्ते या सर्वांसाठी मी शोक व्यक्त करत असून प्रार्थना करत असल्याचं हसीना म्हणाल्या आहेत.
बांग्लादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसीना यांचा 15 वर्षांचा कार्यकाळ 5 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला. त्यांच्या राजवटीच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि देश सोडावा लागला. 5 ऑगस्ट रोजी हसीना यांनी भारत सरकारकडे भारतात येण्याची परवानगी मागितली. ही मागणी सरकारकडून मान्य केली असून शेख हसीना भारतात आल्या. त्या सध्या भारतात आहेत.
बांग्लादेशातील हिंसक निदर्शनांमध्ये शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगच्या लोकांना निवडकपणे लक्ष्य करण्यात आले. त्यांची घरे, हॉटेल, दुकाने जाळण्यात आली. लीग नेत्यांना बेदम मारहाण करण्यात आली. अनेकांना जिवंत जाळण्यात आले. यासोबतच अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्लेही तीव्र झाले, त्यानंतर हजारो लोक भारतीय सीमेजवळ जमा झाले. भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यांना शांत करून बांगलादेशला परत पाठवले. दरम्यान, नुकतेच बांग्लादेशच्या न्यायालयाने निदर्शनेदरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या प्रशासनातील लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.