कधी कुणाचं नशीब पालटेल आणि कधी कुणाचं बॅडलक (Vinesh Phogat Retirement)सुरू होईल याचा काहीच अंदाज बांधता येऊ शकत नाही. कधी कधी जिंकल्यानंतरही पराभूत मानसिकतेचा भाव निर्माण होऊ शकतो. अशीच परिस्थिती कुस्तीपटू विनेश फोगट बाबतीत दिसून येत आहे. फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशला अयोग्य घोषित करण्यात आले. यानंतर विनेश इतकी निराश झाली की तिने कु्स्तीतून निवृत्तीच जाहीर करून टाकली आहे. विनेशने याबाबत एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. आई, कुस्तीने मला पराभूत केलं.
माफ कर. तुझं स्वप्न माझी हिंमत सगळं काही तुटलं. आता यापेक्षा जास्त ताकद माझ्यात राहिली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुमच्या सगळ्यांची मी कायमच ऋणी राहिल असे ट्विट विनेश फोगटने केले आहे. विनेशने सेमी फायनल सामना 5-0 अशा फरकाने जिंकला होता. त्यानंतर फायनलसाठी क्वालिफाय करणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. विनेशने निवृत्ती जाहीर केल्यानंतर कु्स्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, विनेश तू पराभूत झालेली नाही. तुला हरवलं गेलंय. आमच्यासाठी तू नेहमीच एक विजेता राहिली आहेस.
Vinesh Phogat Retirement विनेश फोगट अपात्र घोषित
अंतिम सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता 50 किलो वजनाच्या अंतिम सामन्यात विनेश फोगट खेळू शकणार नाही. अंतिम सामन्यापूर्वी विनेशवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळेे करोडो भारतीयांच्या पदक मिळवण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीने एका निवेदनात सांगितले की विनेश दुसऱ्या दिवशी केलेल्या वजनात अयोग्य आढळून आली. आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमांतील कलम 11 नुसार आता विनेश (भारत) ऐवजी सेमी फायनलमध्ये विनेशकडून पराभूत झालेल्या कुस्तीपटूला फायनल खेळण्याची संधी दिली जाईल. याच कारणामुळे क्यूबा देशाची कुस्तीपटू युसनेलिस गुजमॅन लोपेजला फायनल सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. तर जपानची युइ सुसाकी आणि युक्रेनची ओकसाना लिवाच यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होणार आहे.